Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

५०० झाडांना राखी बांधत ‘सूर्यदत्त’मधील विद्यार्थिनींनी साजरे केले रक्षाबंधन; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ झाडांचे वृक्षारोपण

वृक्ष-रक्षाबंधनातून विद्यार्थ्यांनी जपले पर्यावरण संवर्धनाचे नाते, सख्ख्या भावाप्रमाणे झाडे करतात आपले संरक्षण व पोषण – प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांची भावना

५०० झाडांना राखी बांधत ‘सूर्यदत्त’मधील विद्यार्थिनींनी साजरे केले रक्षाबंधन

पुणे : भावा-बहिणीच्या नात्यातील वीण अधिक घट्ट करण्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. झाडे आपल्याला संरक्षण, ऑक्सिजन देतात. आपले नैसर्गिक पोषण करतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी आणि हे अनोखे नाते अधिक दृढ व्हावे, यासाठी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये अनोख्या पद्धतीने रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला.

वृक्ष-रक्षाबंधनातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचे नाते जपत ५०० झाडांना राखी बांधली. तसेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ७५ देशी, औषधी झाडे लावण्यात आली. हर्बल गार्डन ही संकल्पना सुर्यदत्तमध्ये राबविण्यात येत आहे.

‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये शाळा व महाविद्यालयातील ५०० विद्यार्थिनी, महिला शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या भावांना (झाडांना) राखी बांधली. तर ‘हर घर तिरंगा’च्या धर्तीवर ‘हर वृक्षपर तिरंगा’ हा नारा देत ‘सूर्यदत्त’मधील विद्यार्थी व पुरुष कर्मचाऱ्यांनी झाडांवर झेंडा उभारला. ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्यासह सर्व शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, विभागप्रमुख व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशांत पितालिया, केतकी बापट, सायली देशपांडे, बाटु पाटील यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वृक्षारोपण व वृक्ष-रक्षाबंधन साजरे करण्यात आले. झाडांना मुलींनी राखी बांधली व मुलांनी त्यात तिरंगा ध्वज लावला. झाडेही भावाप्रमाणे आपल्याला ऑक्सिजन, फळे, फुले, ऊर्जा देणारा आहे.

वृक्ष हा शाश्वत स्वरूपाचा आपल्या जीवनाचे रक्षण करणारा भाऊ आहे. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून नाते अधिक घट्ट करण्याचा आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा उद्देश या उपक्रमाद्वारे साध्य झाला.”

“सूर्यदत्त शिक्षण संस्थेचा परिसर पूर्णतः हरित असून, हजारो झाडे येथे आहेत. या झाडांच्या सावलीत आम्ही सगळे सुरक्षित आहोत. ही झाडे येथील विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे संरक्षण करतो. स्वच्छ हवा, प्राणवायू देतो. आजच्या काळात ऑक्सिजन ही महत्वाची गरज आहे. त्यामुळे या झाडांना भाऊ मानून वृक्ष-रक्षाबंधन साजरे करताना आम्हाला व आमच्या विद्यार्थिनींना खूप आनंद झाला,” असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.

Spread the love