Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

अभियांत्रिकी दृष्टीकोनातून प्रत्येकाने उपायकारक बनावे

  • डॉ. दीपक शिकारपूर यांचे मत; ‘सूर्यदत्ता’मध्ये राष्ट्रीय अभियंता दिवसानिमित्त विश्वेश्वरय्या सभागृहाचे उद्घाटन
  • सुहास लुंकड, भारत गीते, नितीन नाईक यांना ‘सुर्यदत्ता विश्वेश्वरय्या इंजिनिअरिंग एक्सलन्स अवार्ड-२०२१’ प्रदान

पुणे : “अभियंता हा समस्यांवर उत्तर शोधणारा असतो. तो क्रियाशील असतो. त्याच्यात नवनिर्माणाची क्षमता असते. अभियांत्रिकी हा एक दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून प्रत्येकाने समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गृहिणी आहे. तीदेखील एक अभियंताच असते. उपलब्ध संसाधनांचा वापर करून घराला आकार देते,” असे प्रतिपादन प्रसिद्ध संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी केले.

भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या सन्मानार्थ साजरा होणाऱ्या राष्ट्रीय अभियंता दिवसाचे औचित्य साधून सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने ‘सुर्यदत्ता विश्वेश्वरय्या इंजिनिअरिंग एक्सलन्स अवार्ड-२०२१’च्या वितरणप्रसंगी डॉ. शिकारपूर बोलत होते.

बांधकाम व्यावसायिक सुहास लुंकड, सीओईपी माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष, उद्योजक भरत गिते, उद्योजक नितीन नाईक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, सुवर्णपदक, सन्मानचिन्ह आणि स्कार्फ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

बावधन येथील सुर्यदत्ताच्या कॅम्पसमध्ये झालेल्या या कार्यक्रमावेळी विश्वेश्वरय्या सभागृहाचेही उद्घाटन झाले. प्रसंगी आयटी तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, संस्थेच्या सल्लागार मंडळाचे सचिन ईटकर, ‘सूर्यदत्ता’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि समूह संचालक प्रा. डॉ. शैलेश कासंडे, संचालक प्रा. सुनील धाडीवाल, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया आदी उपस्थित होते.

१५० पेक्षा अधिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. अभियांत्रिकीबद्दल तीनही पुरस्कारार्थीना प्रश्न विचारात संयोजकांनी त्यांना बोलते केले.

डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, ” आजच्या काळात अभियंत्यांना स्मार्टनेस आवश्यक आहे. कारण एकविसाव्या शतकात सगळ्यांना तात्काळ उपाय हवेत. त्यासाठी आपण बहुकौशल्यासोबतच आत्मविश्वास, इच्छाशक्ती, सकारात्मकता, क्रियाशीलता आणि महत्वाकांक्षा या गोष्टी आत्मसात करायला हव्यात.

” मुलांना प्रत्यक्ष शिक्षणाची सवय व्हावी, याकरिता शिक्षकांनीही प्रत्यक्ष शिकवण्याची तयारी करायला हवी, असेही डॉ. शिकारपूर यांनी नमूद केले.

प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “थोर अभियंता सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचा जन्मदिवस भारतासह श्रीलंका आणि अन्य देशांत साजरा होतो. स्थापत्य अभियंता आणि म्हैसूरचे १९ वे दिवाण असलेल्या विश्वेश्वरय्या यांना स्टेट्समन म्हणूनही ओळखले जाते.

देशाचा सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. जनतेच्या जगण्यावर परिणाम करणारे कार्य त्यांच्या हातून घडले होते. राष्ट्राच्या जडणघडणीत अभियंत्यांचे योगदान मोलाचे आहे.”

सुहास लुंकड म्हणाले, “आजच्या या सन्मानामुळे माझ्यातील अभियंता समृद्ध झाला. बांधकाम क्षेत्रात अभियंता म्हणून जे योगदान दिले, त्याचा हा सन्मान आहे. या सर्वात माझ्या सहकाऱ्यांचे, कामगारांचे, सहकारी अभियंत्यांचे योगदान आहे. त्यांना हा सन्मान समर्पित करतो. बांधकाम क्षेत्राला कोविडचा मोठा फटका बसला. त्यातून सावरण्याचा प्रयत्न सुरू आहेत.”

भरत गीते म्हणाले, “अभियंता हा जगाची रचना करणारा घटक आहे. नागरीकरण, विकास यामध्ये अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची आहे. प्राचीन काळात अभियांत्रिकी होती. त्याची प्रतीके आपण आज ऐतिहासिक वारसा म्हणून पाहतो.

आधुनिक भारताची जडणघडण करण्यात विश्वेश्वरय्या यांचे योगदान आदर्शवत आहे. अभियांत्रिकी सह मानवतेची शिकवण तितकीच महत्वाची आहे. डॉ. संजय चोरडिया सीओईपीसारख्या महान महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून, त्यांचा सन्मान झाला आहे.”

नितीन नाईक म्हणाले, “कल्पकता, नाविन्यता, सौंदर्यदृष्टी, कामातील विश्वास यातून अभियंता घडतो. युवाशक्ती ही आपली ताकद आहे. भविष्यातील भारत घडवण्यासाठी आपल्यासारख्या युवकांचे योगदान मोलाचे आहे.

नवतंत्रज्ञान आत्मसात करत आपण नवीन आविष्कार घडवावेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्स, मशीन लर्निंग यासारखे नवतंत्रज्ञान आजच्या पिढीने आत्मसात करण्याची गरज आहे.” सायली देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. सचिन ईटकर यांनी आभार मानले.

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love